सायंभरती (भाग दोन)
स्टारशिप सोफा आणि क्लार्क्सवर्ल्ड हे माझे आवडते विज्ञान-कथांवरचे पॉडकास्ट. २००८ साली लघुकथा विभागात ह्युगो पुरस्कार मिळालेली एलिझाबेथ बेअर यांची "टाईडलाईन" ही कथा मी पहिल्यांदा क्लार्क्सवर्ड पॉडकास्टवर ऐकली. कृत्रिम मती (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) भावनाहीन असते किंवा तिला मूल्यांची जाणीव नसते या आपल्या पूर्वग्रहांना धक्का देणारी, अतिशय हृद्य अशी ही कथा. ही कथा मी नंतर बऱ्याच वेळेला वाचली. उत्तर अमेरिकेत घडणारी ही कथा भारताच्या किनाऱ्यावर घडली तर त्या गोष्टीत होणाऱ्या भावनिक गुंतवणूकीत काय फरक पडेल असा विचार अनेकदा माझ्या मनात येऊन गेला.
मी मागच्या वर्षी कुल्फी मासिकासाठी "सायंभरती" या नावाने ही (मूळ कथालेखिकेची परवानगी घेऊन) भाषांतरित/रूपांतरित केली आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ती घडते असे दाखवले. मराठी परिसर, मराठी नावे यांनी कथेच्या भावनिक पडसादांवर फारच फरक पडतो असे माझ्या लक्षात आले. ते भाषांतर दोन भागात पोस्ट करत आहे. तुम्हाला काय वाटते ऐकायला आवडेल. हा भाग दोन. पहिला भाग पाहण्यासाठी हे हॅशटॅग वापरा: #tideline #सायंभरती
======
सायंभरती (भाग दोन) : एलिझाबेथ बेअर यांच्या ‘Tideline’ या कथेचा जितेंद्र वैद्य यांनी केलेला अनुवाद.
तिनं त्यांचे मृतदेह वाळूत पुरले, कारण शत्रूच्या मृतदेहांवर सन्मानानं अंत्यसंस्कार करणं हा तिच्या युद्धविषयक प्रोग्रॅमचा एक भाग होता. तिनं बबन्याच्या पायाला एक लहानसं फळकूट बांधलं आणि त्याच्या इतर छोट्या जखमांवर मलमपट्टी केली. आता त्याच्या जिवाला धोका नव्हता, पण कबरी खोदण्यासाठी त्याच्याकडे मदत मागावी असंही तिला वाटलं नाही. वाळू मऊ होती आणि भराभर कबरी खणून झाल्या. पण मृतदेह पाण्याबाहेर ठेवण्यात तिला यश आलं नाही. तरी तिला जमलं तेवढं तिनं त्यांच्यासाठी केलं.
त्यानंतर तिनं बबन्याला तिच्या दगडाजवळ नेऊन ठेवलं आणि इकडे-तिकडे विखुरलेला तिचा खजिना परत गोळा करायला सुरुवात केली.
#
बबन्याचा पाय मुरगळला होता, आणि खरचटलाही होता. पण हाड मोडलं नव्हतं. थोडा बरा झाल्यावर जणू काही त्या प्रसंगावरची प्रतिक्रिया म्हणून तो आणखीनच दूर दूर जाऊ लागला. एका आठवड्यात तो स्वतःच्या पायांवर उभा राहिला, हिरकणीनं केलेली कुबडी घेऊन हिरकणीच्या वितळलेल्या पायासारखा आपलाही अवघडलेला पाय फरपटत चालायला लागला. ते फळकूट काढून टाकल्यावर तर आणखीनच लांब लांब भटकू लागला. त्याच्या पायात किंचित दोष राहिला होता, पण त्यामुळे त्याच्या वेगात काहीच फरक पडला नाही. आता तो रात्रीही बाहेर राहू लागला. त्याची उंची अजूनही वाढतच होती. आता तो जवळजवळ हिरकणीच्या जुन्या सहकारी सैनिकांइतकाच उंच झाला होता, तशीच स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकलाही होता. लुटारूंबरोबरच्या त्या प्रसंगानं त्याला सावधगिरी शिकवली होती.
बबन्या बरा होत असताना हिरकणीचं काम चालूच होतं. तिच्या धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक सहकार्याला शोभतील अशा शोकसाखळ्या तिला तयार करायच्या होत्या. आणि आता तर तिला रात्रीही काम करता येईनासं झालं होतं. तिनं काळजीपूर्वक वाचवलेली ऊर्जा बबन्याला त्या हल्लेखोरांपासून वाचवताना खर्ची पडली होती. बॅटरीमधली ऊर्जा संपून जाण्याआधी काम पूर्ण करायचं असेल, तर रात्री प्रखर दिवे लावणं परवडलं नसतं. तापमानातल्या फरकाचा वापर करून मंद प्रकाशात बघू शकणार्या दृष्टीनं तिला चंद्रप्रकाशातही स्वच्छ बघता येत असे. पण त्या दृष्टीचा रंगसंगती साधण्याच्या कामात काहीच उपयोग नव्हता.
तिला एकेचाळीस साखळ्या करायच्या होत्या. तिच्या मरण पावलेल्या पथकातल्या प्रत्येक सैनिकाकरता एक. आणि तिला निकृष्ट कारागिरी कदापि खपली नसती.
शक्य तितक्या वेगानं काम करण्याचा तिचा प्रयत्न असला, तरी तिची शर्यत अखेर होती ती सूर्य आणि भरती-ओहोटी यांच्याशी.
#
चाळिसावी साखळी ऑक्टोबरच्या शेवटाला तयार झाली. आता अंधार लवकर पडू लागला होता. तिनं सूर्यास्ताआधी एकेचाळिसाव्या साखळीवर काम सुरू केलं. ही साखळी होती कॅप्टन इरावती आंग्रे हिच्यासाठी. ती हिरकणीच्या पथकाची म्होरकी. त्या साखळीत करड्या-निळ्या रंगाची बुद्धमूर्ती ओवायची होती. हिरकणीनं बबन्याला बऱ्याच दिवसांत पाहिलं नव्हतं. पण तिला त्याची तशी काळजी नव्हती. आज सूर्यास्ताच्या आत ही शेवटची साखळी पूर्ण होण्याचं मात्र चिन्ह दिसत नव्हतं.
#
कमीत कमी ऊर्जा खर्च होईल अशा बेतानं रात्री ती स्वतःला निश्चल अवस्थेत राखत असे. बबन्याच्या आवाजानं तिला त्यातून जाग आली. "हिरकणी!", बबन्या तिला हाक मारत होता.
जाग येता येताच तिला कोणीतरी रडल्याचा आवाज ऐकू आला. लहान बाळ? पण बबन्याच्या हातात बाळ नव्हतं, तर कुत्र्याचं एक पिल्लू होतं. तिच्या पथकाबरोबर कधी-कधी कुत्रे आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे मानव साथीदार काम करत असत. त्याच मुधोळ हाउंड जातीचं ते पिल्लू. कुत्र्यांना तिची कधीच भीती वाटत नसे, कधी कधी त्यांच्या मानवी साथीदारांना मात्र तिची भीती वाटायची. पण ते तसं कधीच कबूल करत नसत. कॅप्टन आंग्रे एकदा त्यांच्यापैकी एकाला म्हणाली होती, "आमची हिरूपण एखाद्या मोठ्या धनगरी कुत्र्यासारखीच आहे!" आणि कुत्र्याला थोपटावं तसं बोलता बोलता हिरकणीच्या एका दूरदर्शक डोळ्यामागे तिनं थोपटलं होतं. आसपासचे सगळे मानव, अगदी तिला घाबरणारेसुद्धा, सैलावून हसले होते.
कुत्र्याच्या पिल्लाला जखम झाली होती. मागच्या पायावरून रक्त वाहत होतं. "हॅलो बबन्या," हिरकणी म्हणाली.
"मला कुत्र्याचं पिल्लू गावलं.", बबन्या म्हणाला. त्यानं त्याची फाटकी गोधडी पायानं सरळ केली आणि कुत्र्याच्या पिल्लाला तीवर ठेवलं.
"त्याला खायचा विचार आहे का तुझा?" हिरकणीनं विचारलं.
"हिरकणी!", बबन्या दचकून म्हणाला आणि जणू काही हिरकणीपासून त्या पिल्लाचं संरक्षण करण्यासाठी करावं, तसं त्याच्याभोवती हातांचं कडं केलं. "बघ की, त्याला लागलंय." बबन्या म्हणाला.
हिरकणीनं थोडासा विचार केला. "मी त्याची काळजी घ्यावी असं वाटतं का तुला?" तिनं बबन्याला विचारलं.
त्यानं होकारार्थी मान हलवली आणि हिरकणी पुन्हा विचारात पडली. या कामासाठी तिला तिचे प्रखर दिवे लागले असते. त्यासाठी ऊर्जा लागली असती. ती एकदा संपली की संपली. परत न मिळण्यासारख्या इतरही काही गोष्टी. प्रतिजैविकं, रक्तस्राव थांबवण्याची औषधं, आणि शस्त्रक्रियेची इतर सामग्री. आणि एवढं सगळं करून तो प्राणी मरण्याचीही शक्यता होतीच. पण हिरकणीला माहिती होतं, की कुत्रे मोलाचे असतात. कुत्र्यांचे मानव साथीदार त्यांना मोठ्या मानानी वागवत, कॅप्टन आंग्रे तिला जितक्या मानानं वागवत असे, त्याहूनही अधिक. शिवाय तिच्या ज्ञानभांडारात पशुवैद्यकीय विज्ञानाच्या फाइल्सही होत्या.
हिरकणीनं तिचे प्रखर दिवे चालू केले आणि त्या फाइल्स वाचायला घेतल्या.
#
पहाट होण्याआधी आणि बॅटरीमधली ऊर्जा संपून जाण्याआधी तिचं काम संपलं. सूर्य वर आला, तेव्हा तो छोटा कुत्रा शांतपणे श्वासोच्छ्वास करत झोपी गेलेला होता. त्याच्या पुठ्ठ्यावरची खोल जखम तिनं स्वच्छ करून शिवून टाकली होती आणि त्याच्या रक्तप्रवाहात भरपूर प्रतिजैविकं मिसळली होती. आता ती परत शेवटच्या साखळीकडे वळली. तिला आता वेगानं काम करावं लागणार होतं. कॅप्टन आंग्रेच्या साखळीसाठी तिनं सर्वांत नाजूक आणि सुंदर मणी राखून ठेवले होते. ते फुटू नयेत याची काळजी घेत घेत, आणि इतर साखळ्या करण्याचा अनुभव गाठीला बांधून तिला ती शेवटची साखळी करायची होती.
दिवस जसजसा पुढे सरकू लागला, तसतश्या तिच्या हालचाली मंदावू लागल्या. काल रात्री वापरलेल्या ऊर्जेची भरपाई सूर्याच्या उन्हानं होईनाशी झाली होती. पण मण्यामागून मणी ओवला जात राहिला आणि हळूहळू साखळी आकार घेऊ लागली. काशाचे, खापरांचे, काचेचे आणि शिंपल्यांचे तुकडे. आणि हिर्यासारख्या भासणार्या, गारेच्या निळसर-राखी खड्याची ती बुद्धमूर्ती. कारण कॅप्टन इरावती आंग्रे ही हिरकणीची संचालिका होती.
सूर्य डोक्यावर आला, वाढलेल्या उन्हामुळे हिरकणीच्या बॅटऱ्या चांगल्या तापल्या, आणि तिच्या कामाचा वेग वाढला. बबन्यानं दिलेलं पक्ष्याचं उरलंसुरलं मांस मटकावून तो लहान कुत्रा तिच्या सावलीत गाढ झोपला होता. पण बबन्या दगडावर चढला आणि पूर्ण झालेल्या साखळ्यांच्या बाजूला मांडी घालून बसला.
"कुनासाठी ह्ये?" बबन्यानं तिच्या नाजूक कामाच्या हातातल्या साखळीला स्पर्श करत विचारलं.
"कॅप्टन इरावती आंग्रे." एक हिरवा-करडा, जंगलाच्या झाडाझुडपांत लपून जाईलशा रंगाच्या सैनिकी गणवेषाची आठवण करून देणारा खापराचा तुकडा साखळीत गुंफत हिरकणी म्हणाली.
"सरदार आंग्रे..." बबन्या म्हणाला. त्याचा आवाज आता फुटायला लागला होता. उत्तर येत असल्यानं उत्तेजित होऊन 'सरदार' घोगऱ्या आवाजात, तर 'आंग्रे' चिरकलेल्या उंच आवाजात. "ती शिवाजीम्हाराजांची सरदार व्हती. आनि त्यांच्या युद्धाच्या बोटींची म्होरकी, ना?", तो स्वतःच्या स्मरणशक्तीवर खूश होत अभिमानानं म्हणाला.
"नाही, ते दोन वेगवेगळे आंग्रे होते." हिरकणी म्हणाली. "तुला लवकरच इथून निघावं लागणार आहे." तिनं आणखी एक मणी साखळीत गुंफला, कड्याची तार पिळली, आणि नाजूक कामाच्या हातानं कड्याची तार गाठवली.
"पन तू येशील कशी? तुला तर चढताबी येत न्हाई."
बोलता बोलता बबन्यानं सहज एक साखळी हातात घेतली. विष्णू तुपेसाठीची ती साखळी. बबन्यानं ती सरळ केली आणि तीतले मणी उन्हात चमकू लागले. साखळीच्या कड्या मंद आवाजात किणकिणल्या.
बबन्या दिवसभर तिच्याजवळ बसून राहिला. संध्याकाळ व्हायला लागली, तसतश्या तिच्या हालचाली मंदावू लागल्या. आताशा ती जवळजवळ फक्त सौरऊर्जेवरच काम करू लागली होती. रात्र झाली की ती निश्चलपणे बसून राहणार होती. वादळं येऊ लागली की समुद्राच्या लाटा तिच्या डोक्यावरून जाणार होत्या आणि त्यानंतर सूर्यही तिला जागं करू शकणार नव्हता.जवळजवळ होत आलेल्या साखळीवरचे तिचे हात थबकले आणि ती म्हणाली, "तुला गेलं पाहिजे." नंतर ती त्याला खोटंच म्हणाली, "मला नको आहेस तू इथे थांबायला."
"ही कुनासाठी हाय?" त्यानं विचारलं. खाली तिच्या पायाशी निजलेल्या त्या छोट्या कुत्र्यानं डोकं वर केलं आणि कुंई कुंई आवाज केला. "गणोबा पाटील." हिरकणी उत्तरली. आणि मग तिनं त्याला गणोबाची गोष्ट सांगितली. मग आनंद विसपुतेबद्दल, मग अंबिका नरवडेबद्दल, चारू यादवबद्दल, फरहान समदबद्दल, विष्णू तुपेबद्दल, टायरॉन गोनसल्विस बद्दल, इरावती आंग्रेबद्दल, अमजद पठाणबद्दल, अभय वाळंगकरबद्दल. हळूहळू रात्र पडत गेली आणि तिचा आवाज आणि तिची नजर - दोन्ही काम करेनाश्या होईपर्यंत तिनं त्याला गोष्टी सांगितल्या.
#
सकाळी त्यानं इरावती आंग्रेची पूर्ण झालेली साखळी तिच्या हातात ठेवली. त्यानं रात्री शेकोटीच्या प्रकाशात काम करून ती पूर्ण केली असणार. "कड्या कडक करायच्या राहिल्याती फक्त." तो म्हणाला.
काही न बोलता तिनं एक-एक कडी हातात घेऊन गाठवली. तो लहान कुत्रा स्वतःच्या पायांवर उठून उभा राहिला होता. थोडासा लंगडत, खडकाच्या बुडाशी हुंगत होता; लाटा, समुद्रपक्षी, तिरका तिरका चालणारा एक खेकडा या सगळ्यांवर भुंकत होता. हिरकणीनं शेवटची कडी गाठवली आणि हात लांबवून ती साखळी बबन्याच्या खांद्याभोवती लपेटली. तो अगदी स्थिर बसून राहिला. त्याच्या गालावर मऊ लव उगवू लागली होती. तिच्या पथकातले पुरुष मानव दाढी करून ते केस काढून टाकत असत. बायकांच्या चेहऱ्यावर केस उगवत नसत.
"पन तू तर म्हणाली व्हतीस की ही सरदार आंग्रेंसाठी केलीया म्हणून." त्यानं साखळी वर धरली आणि उन्हात चमकणार्या तीतल्या काचा आणि खडे न्याहाळू लागला.
"तिची आठवण कुणाच्या तरी मनात जागी राहावी यासाठी आहे ती साखळी." हिरकणी म्हणाली. या वेळी तिनं त्याची चूक दुरुस्त केली नाही. तिनं उरलेल्या चाळीस साखळ्या उचलल्या. सगळ्या मिळून जड होत्या त्या. बबन्याला या सगळ्या पेलवतील का, तिच्या मनात विचार आला. "ही साखळी घाल आणि तिची आठवण ठेव. कुठली साखळी कुणाची हे आठवतं का तुला"?
एक-एक करत त्यानं सर्वांची नावं घेतली, आणि हरेक नावानिशी एक-एक करत तिनं साखळ्या त्याच्या हाती दिल्या. भांडारकर, तुळपुळे, गाडगे, आणि अष्टपुत्रे. त्यानं दुसरी गोधडी वाळूत पसरली - कुठे मिळाली होती त्याला दुसरी गोधडी? बहुधा जिथे त्याला तो कुत्रा सापडला होता, तिथेच. त्यानं त्या निळ्या गोधडीवर चाळीसच्या चाळीस साखळ्या ठेवल्या. त्या उन्हात चमकत होत्या.
"मला विष्णू तुपेची गोष्ट सांग." हिरकणी तिचा हात विष्णू तुपेच्या साखळीवर फिरवत म्हणाली. बबन्यानं तिला गोष्ट सांगितली. अर्धी विष्णू तुपेची आणि अर्धी सावळ्या तांडेलाची, एकमेकींत मिसळून गेलेली. असेना का मिसळलेली, छानच आहे की ही गोष्ट, असं तिला वाटलं. आणि मानवाच्या गोष्टींतल्या कुठल्या चांगल्या, कुठल्या वाईट हे मला तरी कितपत कळतं कोणास ठाऊक, असंही तिला वाटलं..
"साखळ्या घेऊन जा." ती म्हणाली. "शोकदागिने आहेत ते. लोकांना दे, आणि त्यांना प्रत्येक साखळीची गोष्ट सांग. मृतात्म्यांची आठवण ठेवतील आणि त्यांचा मान राखतील, अशाच लोकांना त्या दे."
"कुठं भेटनार मला ही समदी लोकं?" बबन्या थोडा खिन्नपणे, थोडा रागानं म्हणाला. "हितं तर कुनीबी न्हाय."
"नाही," हिरकणी म्हणाली, "इथे नाही कुणीच. तुला जाऊन शोधावं लागेल त्यांना."
#
पण बबन्या तिला सोडून गेला नाही. तो आणि त्याचा कुत्रा किनार्यावर सफर करून परत यायचे. हळूहळू थंडी वाढू लागली. तिचा निद्राकाळ अधिकाधिक दीर्घ आणि अधिकाधिक गाढ होत गेला. फक्त माध्यान्हीलाच तिला जाग येण्याइतकी सौरऊर्जा मिळू लागली. वादळं आली, पण हिरकणी तिच्या आवडत्या खडकाच्या मागे असल्यामुळे पाण्यापासून थोडी तरी वाचली. खाऱ्या पाण्यानं तिच्या सांध्यांना गंज चढला, पण निदान तिचा प्रोसेसर अजून चालू होता. ती आता हालचाल करत नसे. दिवसासुद्धा फारच क्वचित बोलत असे. बबन्या आणि तो लहान कुत्रा तिचं शरीर आणि तिचा खडक वादळांपासून आसरा म्हणून वापरू लागले. बबन्याच्या शेकोटीच्या धुरामुळे तिची एक बाजू काळवंडली.
ती जमेल तितका ऊर्जेचा साठा करत होती.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिच्याकडे हवी तेवढी ऊर्जा साठली. बबन्या आणि त्याचा छोटा कुत्रा नेहमीसारखेच कुठेतरी भटकायला गेले होते. ते परत येईपर्यंत तिनं शांतपणे वाट पाहिली. ते आल्यावर ती बबन्याला म्हणाली, "तुला इथून निघालं पाहिजे." आणि बबन्यानं विरोध करायला तोंड उघडायच्या आधीच ती पुढे म्हणाली, "सरदार जसे मोहिमेवर जायचे, तशी तूही मोहिमेवर जायला निघण्याची वेळ आली आहे."
त्याचा हात इरावती आंग्रेच्या साखळीकडे गेला. तो ती साखळी दोन वेढे देऊन गळ्यात घालून ठेवत असे. आपल्या फाटक्या जाकिटाखाली त्यानं ती दडवून ठेवली होती. इतर साखळ्या त्यानं हिरकणीला परत केल्या होत्या, पण ही भेट मात्र त्यानं ठेवून घेतली होती. "मोहीम?"
गंजून कुरकुरणारे सांधे हळूहळू हलवत तिनं बाकीच्या साखळ्या स्वतःच्या डोक्यावरून काढल्या. "या साखळ्या ज्या लोकांच्या आहेत, त्या लोकांना तू त्या दिल्या पाहिजेस."
झटकल्याप्रमाणे हात हलवून तिचे शब्द उडवून लावत तो म्हणाला, "ते तर समदी मेल्याती"
"माझ्या पथकातले सगळे सैनिक मरण पावले, पण त्यांच्या गोष्टी अजून जिवंत आहेत. तू त्या कुत्र्याच्या पिल्लाला का वाचवलंस?"
बबन्यानं जीभ ओठांवरून फिरवली, गळ्यातल्या साखळीशी चाळा केला, आणि तो म्हणाला, "कारन तू मला वाचिवलंस अन मला गोष्टी सांगितल्यास. चांगल्याबी अन वाईट सैनिकांच्याबी. त्या रेश्मानंबी कुत्र्याला वाचवलं आस्तं का न्हाई? अन सुपरमॅननंबी."
रेश्मा शेलारला शक्य असतं, तर तिनं त्या कुत्र्याला नक्की वाचवलं असतं, हिरकणीला वाटलं. आणि अमजद पठाणनं या मुलाला वाचवलं असतं. उरलेल्या साखळ्या तिनं बबन्यासमोर धरल्या. "मग बाकीच्या मुलांना कोण वाचवणार?"
तो डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत राहिला. हात चोळत तिला म्हणाला, "पन तुलातर चढताबी येत न्हाई."
"नाही येणार मला चढता. आणि म्हणूनच माझ्यासाठी तुला हे काम केलं पाहिजे. गोष्टी लक्षात ठेवतील असे लोक शोध. माझ्या पथकाबद्दलच्या गोष्टी ज्यांना सांगता येतील, असे लोक शोध. मी या हिवाळ्यापलीकडे जगणार नाही." आणि मग एकदम स्फूर्ती येऊन हिरकणी म्हणाली, "म्हणून मी तुम्हांला या मोहिमेवर पाठवत आहे, सरदार बबन्या."
हिवाळ्यातल्या मंद प्रकाशात साखळ्या चमकत होत्या. त्यांच्यामागे करडा, सुस्तावलेला समुद्र पसरला होता. "कोन लोक?"
"एखाद्या लहान मुलाला मदत करतील असे लोक." हिरकणी म्हणाली. "किंवा एखाद्या जखमी कुत्र्याला वाचवतील असे लोक. चांगल्या पथकातले चांगले सैनिक जसे असतात, तसे लोक."
तो थबकला. आणि मग त्यानं त्याचे हात पुढे करून साखळ्यांवरून फिरवले. मणी किणकिणले. त्यानं त्या साखळ्या त्याच्या दोन्ही हातांत घालून कोपरांपर्यंत मागे सारल्या आणि इतके दिवस तिनं वागवलेलं ओझं स्वतःकडे घेतलं.
*****
[भाग दोन समाप्त. कथा समाप्त.]
दोन्ही भाग पाहण्यासाठी खालील हॅशटॅग वापरा:
#tideline #सायंभरती
लिंक:
- सायंभरती (Tideline) — आधीचा भाग ← भाग १
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २४ मार्च, २०२५.