Jiten Vaidya

← सर्व लिखाण

मार्चच्या पहिल्या आठवड्यात "मेबी हॅपी एंडिंग" या नाटकाबद्दल एका मैत्रिणीला पत्र लिहिले होते. त्या पत्रातला नाटकाबद्दलचा भाग इथे पोस्ट करत आहे:

.... न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवे नावाचा एक रस्ता आहे तिथे खूप नाटकाची थिएटर्स आहेत आणि आपल्याकडे जशी संगीत नाटकांची परंपरा होती तशीच या थिएटर्समध्ये लागणाऱ्या संगीत नाटकांची परंपरा अमेरिकेत आहे हे तुला बहुधा माहिती असेलच. तर ब्रॉडवेवरच्या बेलास्को थिएटर मध्ये लागलेले "मेबी हॅपी एंडिंग" हे एका कोरिअन पुस्तकावर आधारित एक फारच सुरेख संगीत नाटक बघितल, त्याची ही गोष्ट.

गोष्ट तशी साधी सरळ आहे.

नाटकाच्या सुरुवातीला आपल्याला एक लहान अपार्टमेंट मध्ये राहणारा रोबोट दिसतो. गोष्ट भविष्यात घडत आहे आणि रोबोट्स अगदी माणसांसारखे वागत नसले तरी माणसांसारखेच दिसतात. आपल्याला हळूहळू लक्षात येतं की हा रिटायर्ड हेल्पर रोबोट आहे. त्याचा मालक एक जाझ म्युझिक मध्ये बुडून गेलेला मनुष्य होता. काही कारणाने त्याला या रोबोटची आवश्यकता संपल्यामुळे त्याने या रोबोटला इथे सोडून दिले आहे. परंतु जाझच्या मासिकाचे आपले सबस्क्रीप्शन मात्र त्याला दिलेले आहे. हा रोबोट आपला नायक. काहीच वेळात नायिकेचा प्रवेश होतो. ती आपल्या रोबोटची शेजारी असते. आत्तापर्यंत त्यांची ओळख व्हायला काही कारणच घडलेलं नसतं, पण आता तिचा चार्जर बिघडलेला असतो आणि तिचा चार्ज संपायच्या आधी घाबरून जाऊन ती आपल्या रोबोटच्या अपार्टमेंटच्या दारावर टकटक करते. आपला रोबोट तिला स्वतःचा चार्जर देतो. पण तिला रोज त्याचा चार्जर काही तास तरी वापरायला लागणार असतो आणि यातून त्यांच्या मैत्रीला सुरुवात होते. आपल्या हे पण लक्षात येतं की हे दोघेही जुनी मॉडेल आहेत, त्यांना लागणारे रिप्लेसमेंट पार्ट तयार होणे बंद झालेले आहे, आणि वर्षा-दोन वर्षात हे रोबोट बंद पडणार आहेत. त्यात तो "मॉडेल तीन" चा आहे तर ती "मॉडेल पाच" ची, जरा जास्ती प्रगत. तिला ड्राईव्ह करता येते, मानवी भावना जास्त चांगल्या तऱ्हेने समजतात, पण तिची बॅटरी मात्र कमकुवत आहे. आपला नायक मॉडेल तीन असल्यामुळे जरा जास्त लिटरल आहे, उदाहरणार्थ, त्याला कोणीही कधीही थँक्यू म्हटले की त्याला रिफ्लेक्सिव्हली "यु आर वेलकम" असे म्हणावेच लागते. याचा नाटकात नर्म विनोदासाठी वापर केलेला आहे. एकंदरीत तो स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची फारशी कल्पना नसलेल्या पण मूळच्या प्रेमळ, मायाळू असलेल्या एखाद्या पुरुषाचा उत्तम नमुना आहे

तर त्याला सुरुवातीला आपल्या रुटीनमध्ये बाधा आल्यामुळे आणि ती मॉडेल पाच असल्यामुळे शिष्टच असणार असा पूर्वग्रह असल्यामुळे तिच्याबद्दल जरा "ही काय बयाद आली" असेच वाटते. तिला त्याच्या या सगळ्या अभिनिवेशाची मजा वाटते. आणि ते जरी रोज भेटत असतात तरी ते ठरवतात, आणि एकमेकाला वचन देतात, की ते एकमेकांच्या प्रेमात बिमात पडणार नाहीत.

जशी त्या दोघांची मैत्री होत जाते, तसे तिच्या लक्षात येते की त्याला वाटते आहे की त्याचा मालक त्याला परत घेऊन जायला येईल (आपल्याला तो त्याच्या मालकाच्या पत्राची वाट पाहत आहे हे पहिल्यापासूनच दाखवलेले असते. त्याच्या सुरुवातीला थोड्याशा कार्टूनीश असणाऱ्या कॅरेक्टरला यामुळे थोडी करुण्याची दिसेल न दिसेल अशी झालर मिळते). आणि तिला हेही समजते की त्याचा मालक जेजू बेटावर राहतो. (जर तू के-ड्रामा बघितले असशील तर तुला जेजू बेट माहिती असेल :). त्याला त्याच्या मालकाचा पत्ता माहिती आहे आणि तिथे जाण्यासाठी तो जुने स्पेअर पार्ट गोळा करून ते काळ्या बाजारात विकून हळूहळू पैसे गोळा करत आहे. तिला आठवते की तिच्या मालकीणीने तिला सांगितलेले असते असते, की पूर्वी सगळीकडे असणारे काजवे आता फक्त जेजु बेटावर उरलेले आहेत. आणि तिला आपल्याला फारसा वेळ उरलेला नाही याची जाणीव असते आणि म्हणून ती त्याला म्हणते, मला गाडी चालवता येते आणि माझ्या मालकिणीने मला रिटायर केले तेव्हा तिची गाडीही मला दिली आहे तर आपण दोघं गाडीने जेजू बेटावर जाऊया. त्याला पहिल्यांदा अजिबात जायचं नसतं कसातरी हो नाही करत तो तयार होतो. पुढचे नाटक त्यांचा प्रवास, एकमेकांची हळू हळू जास्त जास्त ओळख होणं, जेजू बेटावर त्याच्या मालकाच्या मुलाची भेट आणि दोघे परत आल्यावर काय होतं याबद्दल आहे

या नाटकात ते दोघेजण रोबोट असण्याचा फारच चतुरपणे वापर करून घेतलेला आहे. जेव्हा त्यांना हवे वाटते, तेव्हा ते न बोलता फक्त एकमेकांच्या डोक्याला दोन बोटे लावून एकमेकांशी जुन्या आठवणी म्हणजेच रेकॉर्डिंग शेअर करू शकतात. जेव्हा हे घडत असते तेव्हा आपल्याला त्या जुन्या आठवणी इतर लाईव्ह पात्रे वापरून, किंवा इतर पात्रांचा व्हिडिओ वापरून, किंवा एका प्रसंगात तर एका पात्राचा होलोग्रम वापरून - दाखवले जातात. नेपथ्य फार म्हणजे फारच सुरेख आहे. व्हिडिओ दाखवण्यासाठी संपूर्ण रंगमंचाच्या अवकाशात अर्ध ट्रान्सपरंट असे पण आपल्याला ते आहेत हे कळणारही नाही असे पडदे होते, आणि त्यावर हे व्हिडिओ आणि स्पेशल इफेक्ट्स वगैरे प्रोजेक्ट केलेले होते. हे सगळं मी नंतर वाचलं कारण हे सगळं इतकंच सफाईने केलेलं होतं की नाटक चालू असताना आपण त्या सगळ्यात इतके बुडून गेलेलो असतो, की हे सगळं कसं केलं असेल याकडे आपलं लक्षही जात नाही. फार फारच उच्च दर्जाचे नेपथ्य.

तर या आठवणी पाहून आपल्या लक्षात येतं की दोघेही जण आपापल्या मालकांबरोबर झालेल्या अनुभवातून पोळले गेलेले आहेत. ती तिच्या मालकीणीची खरोखरच मैत्रीण होती. तिची मालकीण जेव्हा तिच्या नवऱ्याच्या प्रेमात पडायला लागली, आणि "हे खरोखरच प्रेम आहे का?" हा जुना प्रश्न तिला पडायला लागला, तेव्हा आपली रोबोट एखाद्या मैत्रिणीसारखे हे सगळे ऐकून घेते. तिच्याकडे त्या दोघांचीही रेकॉर्डिंग असतात ती बघते, आणि तिला "हो, हे प्रेमच आहे तोही तुझ्या प्रेमात आहे, घाबरू नकोस, जा पुढे," असा सल्ला देते. आणि मी जरी तुला ही गोष्ट गद्यात सांगत असलो तरी ही संगीतिका आहे आणि हा सगळा भाग सुंदर गाण्यांमध्ये सांगितलेला आहे. पण लग्नानंतर काही वर्षात तिच्या नवऱ्याला असुरक्षित वाटू लागते. त्याच्यापेक्षा ती जास्त कम्पीटेंटआणि सोफिस्टिकेटेड आहे असे वाटू लागते. आणि तो याबद्दलही आपल्या रोबोट शी बोलतो, आणि बोलता बोलता एकदा तिला म्हणतो, की आता मी माझ्या बायकोच्या प्रेमात नाही, पण मी आता तुझ्याच प्रेमात पडलो आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आणि आता इथे आपल्याला रोबोट म्हणून असलेली तिची मर्यादा दाखवलेली आहे. जसा आपला पुरुष रोबोट कोणी थँक्यू म्हटल्यावर यु आर वेलकम म्हणल्याशिवाय राहू शकत नाही, तशी तीही "तुझे माझ्यावर प्रेम आहे का?" असा प्रश्न विचारल्यावर "मला हा प्रश्न समजत नाही" असे किंवा या आशयाचेच काहीतरी बोलू शकते. तो सगळा भाग फारच हृदय आहे. शेवटी त्याला आपण काय करत आहोत हे लक्षात येते. तो तिला शेवटची पाच मिनिटे तुझ्या मेमरी मधून डिलीट कर असे अगदी सांगतो पण तिला तिच्या मालकीणीच्या संमतीशिवाय ते करणे अशक्य असते. पुढे तिची मालकीण आणि तिचा नवरा सेपरेट होतात. त्या दोघांचेही दुःख आपली रोबोट पाहते. आणि "How can humans fall in love when it leads to such intense pain" अशा अर्थाचे एक गाणे गाते. शेवटी तिची मालकीण तिला तिचा पासवर्ड देते, तिला गाडी देते, आणि तिला रिटायर करते.

आपला पुरुष रोबोट हा त्याच्या मालकासाठी जणूकाही त्याचा सरोगेट मुलगाच असतो. त्याच्याबरोबर त्याच्या इतकाच इंटरेस्ट घेऊन जॅझ म्युझिक ऐकणारा, त्याची काळजी घेणारा आणि त्याचे समाधान एवढे एकच आयुष्यात ध्येय असणारा, असा. आपल्याला नंतर समजते की त्याला एक खरा मुलगा आहे, आणि त्या मुलाला या रोबोटची असूया वाटते. आणि त्यामुळे जेव्हा वडिलांची तब्येत खराब होते आणि वडिलांना स्वतःकडे राहायला आणण्याची वेळ येते, तेव्हा तो अशी अट घालतो की वडिलांनी या रोबोटला रिटायर करावे आणि त्यांच्याबरोबर त्याच्याकडे घेऊन येऊ नये. या संभाषणातला त्याच्या मालकाच्या बाजूचा भाग आपल्या रोबोटने ऐकलेला असतो पण त्याचा अर्थ त्याला समजलेला नसतो. जेव्हा त्याची मैत्रीण त्या आठवणी पाहते तेव्हा तिला मात्र त्याचा अर्थ बरोबर समजतो.

पण हे सगळे डिटेल्स झाले ही गोष्ट खरी आहे ती त्या दोघांच्या एकमेकांच्या प्रेमात पडण्याची गोष्ट. सुरक्षित, एकंदरीत समाधानी अशा कोशातून बाहेर येऊन प्रेमाबरोबरच तीव्र दुःख आणि डिसपॉइंटमेंट येऊ शकते हे माहिती असून, त्याची भीती वाटत असतानाही, प्रेम करण्याचे धाडस करणे. त्याला प्रतिसाद मिळणे, आणि मृत्यूची चाहूल लागण्याची सुरुवात झाल्यानंतरही त्यातले सुख, समाधान, सोबत अनुभवणे, हा त्या गोष्टीचा गाभा आहे. लोक प्रेमात पडायला लागल्यावर किंवा त्यांना जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव झाल्यावर जे काही होतं ते ती दोघेजण रोबोट असल्यामुळे जास्ती explicitly आणि थोडं फार कार्टुनिशली - pretending as though it doesn't matter - असं त्यांना दाखवता आलं आहे. फार फार छान वापरल आहे त्यांनी ते. त्याचा व्हायचा तो परिणाम होतोच, खरं म्हणजे जास्तच परिणामकारक होतं ते. लेखन, अभिनय, गायन, म्युझिक, नेपथ्य या सगळ्या गोष्टीत कुठेच नाव ठेवायला जागा नव्हती. न्यू यॉर्क मध्ये जगातल्या सगळीकडून टॉप लोकं येतात हेच खरं......

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ३० एप्रिल, २०२५.