आजच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक फारच अस्वस्थ करणारा लेख वाचला.
थोडक्यात: कामासाठी चॅट जीपीटी वापरणारा आणि पूर्वी कधीच मानसिक आजार न झालेला माणूस ब्रेकप मधून जाताना चॅटजीपीटीला एक्झिस्टेन्शीअल प्रश्न विचारायला लागतो. आणि काही आठवड्यात चॅटजीपीटी त्याला वेडाच्या सीमेवर घेऊन जातो. आणि हा एकटाच माणूस असा आहे असं नाही. काही वेळेला लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याही केसेस बद्दल या लेखात येतं.
जगाला, जगण्याला आपण स्वतः देतो त्यापेक्षा जास्ती, स्वतःचा असा, काहीच अर्थ नाही याची, आणि मनुष्य म्हणून असलेल्या आपल्या मूलभूत एकटेपणाची जाणीव आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी होते. यावर उपाय म्हणून आपण सगळेच खोल, आपल्याला समजून घेईल अशा संवादाच्या शोधात असतो.
आपल्याला सतत उपलब्ध असणारे आणि त्याचे वेगळे मनुष्यत्व, त्याच्या गरजा याचा आपल्याला काहीच विचार करावा लागत नाही असे (जो विचार आपल्याला घरच्यांबद्दल / मित्रांबद्दल करावा लागतो), संवाद साधू शकणारे, आणि आपल्या बाजूने केलेल्या संवादानुसार आपल्याला जे ऐकायचे आहे ते शिकून, तेच आपल्याला फार सफाईदारपणाने सांगू शकणारे असे अस्तित्व किती घातक असू शकते याची आपण कल्पना करू शकतो.
हे तर आहेच, पण अशा गोष्टी ऐकून असंही वाटतं की आपलं मानवी मन हे सुद्धा किती लार्ज लैंग्वेज मोडेल (ज्याचे चॅटजीपीटी एक उदाहरण आहे) सारखच आहे. आपण ज्याला वास्तव म्हणतो ते आपण कोणाशी बोलतो आहे आपण कोणत्या विषयांवर विचार करतो आहे यावर किती अवलंबून असतं.
लेखाची लिंक खाली.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १३ जून, २०२५.