एका मित्राशी - लहानपणी आपल्याला निरनिराळ्या गोष्टींची भीती वाटत असते पण मोठे झाल्यावर आपल्याला त्या प्रकारची भीती कमी वेळेला वाटते - अशा प्रकारच्या गप्पा करत होतो. तेव्हा त्याने सहा-सात वर्षांपूर्वी घडलेला, आता गमतीदार वाटणारा, पण त्यावेळेला त्याला अक्षरशः किंचाळत सुटावे इतकी भीती वाटली होती, असा एक प्रसंग सांगितला. तर त्या प्रसंगाची हकीगत त्याच्याच शब्दात लिहून काढली. ती इथे पोस्ट करत आहे (फोटो गंमत म्हणून जेमिनी वापरून जनरेट केलेला आहे):
माझा एक मोहित नावाचा मित्र आहे. माझ्याहून साधारणपणे दहा वर्षांनी मोठा. दिल्लीत राहतो. अनेक गोष्टी रस घेऊन करतो. तो अमेरिकेत येणार होता आणि आम्ही इतर काही मित्रांबरोबर अमेरिकेत कोलोराडो नावाचे एक राज्य आहे तिथे एका ट्रेकला जाणार होतो. मी कॅलिफोर्नियात राहतो. मला गाडी चालवायचा शौक आहे म्हणून मी कॅलिफोर्नियातून गाडीने तिथे जाणार होतो आणि आमचा ट्रेक झाल्यावर मोहित आणि मी माझ्या गाडीतून कॅलिफोर्नियात परत येणार होतो. आत्ता २०२४-२०२५ मध्ये अमेरिकेत बऱ्याच राज्यात (कॅलिफोर्नियात सुद्धा) गांजा लीगल आहे पण त्यावेळेला नव्हता आणि कोलोरॅडोमध्ये नुकताच गांजा लीगल झाला होता. मी कॉलेजात असताना, कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये एकदा गांजा ओढला होता. लॉनवर झोपून, डोळे बंद करून, रॉक म्युझिक ऐकायला आणि डोळ्यासमोर म्युझिकच्या तालावर बदलणारे कॅलेडीओस्कोप मध्ये बघितल्यासारखे आकार बघायला मजा आली होती.
आमचा दोन दिवसाचा ट्रेक संपला. बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंग करत असल्यामुळे सॅक घेऊन चालायची सवय गेली होती, आणि त्यामुळे चांगला तुंबडून निघालो होतो. बाकी मित्रांना बाय म्हणून मी आणि मोहित परतीच्या प्रवासाला लागलो. संध्याकाळ झाली तेव्हा रात्रीसाठी एका गावात मुक्काम करायचा ठरवला. हायवेच्या जवळच एक मोटेल होते तिथे गेलो आणि समोरच आम्हाला एक गांजाची डिस्पेन्सरी दिसली. मी मोहितला विचारले, "इथे गांजा आता लीगल आहे, ओढायचा का?" तो म्हणाला, "हो, ओढूया की". त्याने मला सांगितले की वीस एक वर्षांपूर्वी हिमालयात ट्रेकिंग करत असताना त्याने साधुंबरोबर बराच गांजा ओढला होता पण आता अनेक वर्षात ओढला नाही आहे. मोहित एकंदरीत जग पाहिलेला, नवीन अनुभवांना सहज सामोरा जाणारा पण उगीचच हुरळून न जाणारा, असा गडी आहे. सहज गंमत म्हणून गांजा ओढून बघण्यासाठी आदर्श सोबत.
आम्ही पहिल्यांदा मोटेलमध्ये गेलो आणि रूम घेतली. रूम घेताना ते नेहमी स्मोकिंग का नॉन स्मोकिंग असे विचारतात, तर आयुष्यात पहिल्यांदाच स्मोकिंग रूम मागितली. सामान रूम मध्ये ठेवलं आणि रस्ता क्रॉस करून मारीयुवाना डिस्पेन्सरीमध्ये गेलो. बाहेरची खोली साधारण डॉक्टरच्या ऑफिसमधल्या रिसेप्शन रूम सारखी दिसणारी. तिथल्या रिसेप्शनिस्ट बाईने शिस्तीत माझे ड्रायव्हर्स लायसन्स आणि माझ्या मित्राचा पासपोर्ट बघितला. आम्ही दोघेही 21 वर्षाच्या वर वयाचे असल्याचे खात्री करून घेतली. आमची नावे आणि जन्मतारखा एका रजिस्टर मध्ये लिहून घेतली आणि हसतमुखाने आतल्या भागात जाणारे दार आमच्यासाठी उघडले.
आत काचेच्या काउंटरखाली निरनिराळ्या प्रकारच्या गांजाच्या कळ्या ठेवलेल्या होत्या आणि तीन चार असिस्टंट मदत करण्यासाठी काउंटर मागे उभे होते. अमेरिकेत उच्चभ्रू, पर्यावरणाबद्दल सजग (आणि अर्थातच महाग) अशा प्रकारच्या जागांमध्ये एक विशिष्ट वातावरण असते. शॉपिंग असिस्टंट साधारणपणे biracial असतात, गोऱ्या लोकांनीही केसाचे dreadlocks केलेले असतात, टॅटूज आणि पियर्सिंग्स यांची मांदियाळी असते. आणि सगळेजण तुमच्याशी अगदी आदबीने, बारीक आवाजात पण जिथे दोन शब्द पुरतील तिथे दहा शब्द वापरून बोलतात. माझ्या मुलीने १६ वर्षाची असताना वयामुळे आणखीनच धारदार झालेल्या अंगभूत तिरकसपणाने या प्रकारच्या एका रेस्टॉरंटची, "हं, समजलं. म्हणजे यांच्या मेनूकार्ड मध्ये यांची प्रत्येक डिश कशी हाताने गोळा केलेल्या गाढवांच्या अश्रूंनी गार्निश केलेली आहे याबद्दल निबंध लिहिलेले असणार", अशा शब्दात संभावना केली होती. पण ते असो. साधारण कशा प्रकारचे वातावरण होते हे तुमच्या लक्षात आले असेल.
काउंटरच्या मागे भिंतीवर शाळेतल्यासारखे फळे लावलेले होते आणि त्याच्यावर कोणीतरी खडूने अगदी मनापासून, चांगल्या अक्षरात, गांजाची निरनिराळ्या प्रकारची व्हरायटलस आणि त्यांचे गुणधर्म लिहिलेले होते. उदाहरणार्थ "टायगर इंडिका - ग्रोंन ऑन हाय हिल्स ऑफ अफगाणिस्तान - स्मूथ फुल बॉडी हाय" वगैरे. एका नाकपुडीत एक वळे, कानात दोन वळी घातलेल्या एका हसऱ्या तरुण मुलाने आमचा ताबा घेतला. आम्हाला कुतहूल होते म्हणून आम्ही त्याचे लेक्चर लक्ष देऊन ऐकले आणि त्याला काही प्रश्नही विचारले. आणि शेवटी सांगितले की आम्ही दोघांनी बरीच वर्षे गांजा ओढलेला नाही आणि "वी वॉन्ट टू हॅव ए रिलॅक्सड इव्हनिंग लिसनिंग टू सम म्युझिक अँड चॅटिंग, सो व्हॉट वुड यु रेकमेंड?". त्याने आम्हाला एक प्रीरोल्ड जॉईंट दाखवला आणि त्याच्या सगळ्या गुणधर्मांबद्दल एक मोठे लेक्चर दिले, आम्ही माना हलवल्या आणि मग त्याने तो एका प्लास्टिकच्या डबी मध्ये आम्हाला पॅक करून दिला. हे आपल्या क्रेडिट कार्डवर नको, अशा मध्यमवर्गीय भीतीने एकदम तोंड वर काढल्यामुळे मी कॅश दिली आणि आम्ही बाहेर पडलो.
जवळच रेस्टॉरंट होते तेथे जेवण करून आम्ही आमच्या खोलीत परतलो, अंघोळी वगैरे उरकल्या आणि शुद्ध चित्ताने आपापल्या बेडवर बसलो :)
आता पुढे काय घडलं हे सांगायच्या आधी जरा थोडी माझ्या मनस्थितीची कल्पना देतो. वरवर मला आपण काही विशेष करत आहोत असे दाखवायचे तर नव्हतेच पण वाटूनही घ्यायचे नव्हते. I wanted to be sophisticated, I wanted to be cool. पण आत थोडी भीती, थोडे काहीतरी आपण निषिद्ध करत असल्याबद्दलची एक्साईटमेंट, अशा सगळ्या भावना होत्या.
तर. खोलीत दोन बेड होते. मध्ये साधारण तीन फूट जागा होती. मोहित त्याच्या बेडवर बसला होता आणि मी माझ्या बेडवर बसलो होतो. बेडवर फिटेड शीट होते आणि बेडवरची ब्लॅंकेट (हल्ली आपल्याकडे पण असतात तशी) तीन बाजूंना घट्ट खोचलेली होती. हवेत थोडा गारवा होता म्हणून मी वरच्या बाजूने ब्लॅंकेट उघडलं त्यात माझे पाय खुपसले आणि कमरेपर्यंत ब्लॅंकेट ओढून घेतले, जॉईंट पेटवला, एक झुरका घेतला, आणि मोहितकडे दिला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत एक दोन झुरके मारत आम्ही जॉईंट एकमेकाकडे देत घेत होतो. थोडा वेळ गेला. दिवसभर ड्रायव्हिंग केलं होतं त्यामुळे दमलो होतो तर थोडी विश्रांती घेऊ, म्हणून हेडबोर्ड वर डोके टेकवून डोळे बंद केले.
डोळे बंद केले आणि क्षणार्धात भीती आणि पॅरानॉइया याची एक प्रचंड लाट मनावर येऊन आदळली, आणि मी त्यात गटांगळ्या खायला लागलो. माझ्या मांड्यांना, गुडघ्यांना, कंबरेला त्या घट्ट ब्लॅंकेटचा जणू विळखा पडला आहे, आणि ते आपल्याला हळूहळू गिळून टाकत आहे, असा भास व्हायला लागला. हातपाय हलवून ते पांघरूण झिडकारून टाकावे अशी एका बाजूने प्रचंड इच्छा होत होती आणि दुसरीकडून कितीही प्रयत्न केला तरी हात किंवा पाय हलवताच येत नव्हते. जोरजोरात किंचाळावे असे वाटत होते पण तेही करता येत नव्हते. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. पण ओरडण्याचा, किंचाळण्याचा विचार मनात आला, आणि मग but what about being cool असाही विचार आला आणि आपण कोठे आहोत याचे थोडे भान आले. आरडाओरडा करून मोहित समोर आपण घाबरलो आहोत, पॅनिक झालो आहोत, हे दाखवायचे आहे का? असा विचार मनात आला, आणि त्याबरोबरच आपसूक डोळे उघडले गेले.
डोळे उघडता क्षणी भीतीची लाट जशी आली होती तशीच ओसरली. मान फिरवून मोहितकडे पाहिले, तर तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता. पहिल्यांदा ब्लँकेट मधून पाय बाहेर काढले. मग हळूच सरकून ते जमिनीवर ठेवले. सो फार सो गुड. खोलीतला प्रकाश थोडा व्हायब्रेट होत होता पण बाकी सगळे नॉर्मल वाटत होते. अचानक मला आपल्याला फार तहान लागली आहे अशी जाणीव झाली. काही झालेच नाही अशा आवाजात मोहितला म्हणालो, "जरा पाणी पिऊन येतो". मी काळजीपूर्वक उठलो पण बॅलन्स व्यवस्थित होता. बाथरूम मध्ये गेलो, ग्लासात पाणी भरून घेतले, आणि ग्लास भरून पाणी प्यायलो. ते एक ग्लास पाणी पिताना मी जेवढा आनंद अनुभवला तेवढा मी कधीही पाणी पिताना याआधी अनुभवलेला नव्हता. प्रत्येक घोट तोंडातून घशात, घशातून गळ्यात, आणि गळ्यातून पोटात जाताना ती संवेदना अतिशय सुखकर वाटत होती आणि ती सावकाशपणें अनुभवता येत होती. आपण दहा मिनिटे तो पाण्याचा एक ग्लास पीत आहोत असे वाटले पण खरे तर नेहमीसारखे एखादेच मिनिट गेले असावे. आता मला एकदम शांत आणि समाधानी वाटत होते. परत बेडवर येऊन बसलो, उरलेला जॉईंट हळूहळू संपवला, म्युझिक लावलं, थोड मोहित बरोबर बोलत, थोड डोळे बंद करून म्युझिक ऐकताना डोळ्यांसमोर तयार होणारे निरनिराळे आकार एन्जॉय करत स्वतःच्या धुंदीत संध्याकाळ घालवली. आणि मग कधीतरी मोहितला गुड-नाईट म्हणून गुडुप झोपून गेलो. :)
(तो पाणी पिताना इतकं छान वाटण्याचा अनुभव? गांजा ओढला की स्पर्शाबद्दल होतं असं हे नंतर कळलं. काही वर्षांनी कॅलिफोर्नियामध्येही गांजा लीगल झाला. एकदा एडिबल गमी घेतल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा अनुभव आला पण तो सांगायचा म्हटला तर ती शृंगार-कथा होईल भीती-कथा नव्हे :))
तर ही माझी गेल्या काही वर्षात वाटलेल्या भीतीची कहाणी. मला वाटली होती त्यापेक्षा लांब जाहली. ऐकणारीला/ऐकणाऱ्याला सुफल संपूर्ण व्हावी.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ८ ऑगस्ट, २०२५.