आरती प्रभूंच्या "नक्षत्रांचे देणें" मधली अजून एक जीवाला भिडणारी कविता. कवितेचे शीर्षक "विळखे".
मला ही कविता उत्कट प्रेमातली अनिश्चितता आणि त्यातून आधार मिळत असला तरीही त्यात अंगभूत असलेली (शमा-परवाना रूपकाची आठवण करून देणारी) "पाशवी समर्थ असोशी" याबद्दल असावी असे वाटते...
विळखे
काल तूं नव्हतीस,
आज तूं आहेस,
उद्या तूं असणार असशील होत्या-नव्हत्याच्या लाटांवरील संधिप्रकाश.
नैवेद्य मागणारा काळ
अक्राळविक्राळ,
उपाशी
तरीसुद्धा कळ्या गिळणारी एक पाशवी समर्थ असोशी :
तिची सोनेरी छटा मुक्त कचपाशावरील.
सनईच्या सुरावटीतील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन
तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर, त्यांतील धुक्याचे कुसुंबी क्षण विषमय नव्हेत तरीसुद्धा
बेहद्द उद्दाम :
त्या डोळ्यांनी तूं केलेली बदनामीही बदामी असते;
अद्दल घडलेले घडे फुटूनसुद्धा भरलेले असतात;
चक्कर देणारे भोंगळ बहाणेही ससाणे होतात;
वाटायला लागतें की आम्ही कोण तुझ्यापुढे?
दुःखाचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस
तेव्हा सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात, सापडतात विचित्र आकार लहरी हवेला
आणि निर्झरांच्या सोनसाखळ्या उस्कटून पडतात रानोमाळ,
भासमान होतात मंद्रसप्तकाचे जन्म-आदिकाल,
झाडांचे बुंधे समंधांसारखे रात्री खातात ओरबाडून
आणि मातीच्या कणाकणांतून कळे धरतात गेलेले पावसाळे.
हें छप्पर खरेंच आहे
पण त्याखालचे आधार अंधारस्तंभांसारखे विळखे देतात. काल तूं नव्हतीस?
खरें नव्हे. आज तूं आहेस? खरें नव्हे.
उद्या असणार? खरें नव्हे.
फक्त तो एक शिल्पकार खरा ज्याने वाऱ्याला दिले
झाडाझुडपांचे स्पर्श, विळखे.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २७ फेब्रुवारी, २०२६.