र कृ जोशी यांची एका विलक्षण फाँट मध्ये रेखाटलेली "मी कुमार ऐकतो" नावाची कविता सापडली. कवीने घातलेले शुद्धलेखनाच्या नियमात न बसणारे काही अनुस्वार घालायचे राहिले आहेत, पण ही ती कविता:
मी कुमार ऐकतो - र कृ जोशी
मी,
झिजलेला अर्थ
जोपासीत होतो, डोळे झाकून
आणि जगत होतो नाईलाज.
पहात निरर्थक आकार
खिळखिळ्या अक्षरांत.
आणि तू भेटलास.
लावलास सूर आणि
चढवलास साज अबलख
वरच्या रेघेवर,
झळाळून निघालं अक्षरनअक्षर
माझ्यातलं
शहारून गेली वेलांटी
डोक्यावरची
अन मोहरला उकार
पायाखालती.
भरलेस सात भावसमुद्र
वेड्यावाटोळ्या आकारात
अन उभ्याआडव्या रेघात
कैक उर्मी उसळवल्यास
ओतलस दर्द
दर्दाच्या रफारांत
आणि अमाप रंग
इवल्याश्या अनुस्वारांत.
बेभान तानेंत सामावलास
चैतन्याचा प्रलयओघ
एका चकोरी आर्त स्वरांत
चिंधड्या दिलाच्या लाखकरोड.
तोडलींस एक परार्ध योजनं
अर्ध्यामुर्ध्या आलापांत
आणि त्रिलोक यात्रेचं पुण्य
बसल्या बसल्या बैठकींत.
मापलीस धुंदी अंतराची
अंतराळी कवाड उघडून
आणि उधळलास तिथून अबीर गुलाल
सात सुरांचा
अन थांबला हो ली बरोबर
होली खेळायचा.
राजन घरी आला तरी
अजून नाही रहात थिर
गोरीच्या डोळ्यातला कजरा.
मनबसियाची मऊ मांडी मिळाली
पण अजून नींद तशीच उचटलेली.
अजून सैया मूरख, अनारी
कारी बदरी निघून गेलेली
अजून चुनरी रंगात भिजलेली
ज्येष्ठाच्या भर दुपारी.
म्हणून
तुला तुझ्या सुरांची शपथ
तुला तुझ्या गळ्याची शपथ
तुला माझी शब्दाची शपथ
तुझ्या गळ्यात मला राहू दे.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २३ ऑक्टोबर, २०२४.