Jiten Vaidya

← सर्व लिखाण

हरीशचंद्र थोरात यांचे भालचंद्र नेमाड्यांच्या “हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ” या कादंबरीची समीक्षा करणारे “अडगळीचे अलंकारशास्त्र” हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचले. मला ते वाचायला फार मजा आली. त्या कादंबरीचे प्रकाशक येशू पाटील यांनी या पुस्तकावर फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यावर मी हे छोटे परीक्षण कॉमेंट म्हणून टाकले होते ते आज इथे परत पोस्ट करत आहे:

जेव्हा मी “अडगळीचे अलंकारशास्त्र” वाचायला हातात घेतले त्यावेळेला माझ्या मनात त्याबद्दल काही विशेष अपेक्षा नव्हत्या. भारतात असताना ललित मासिकात आणि अमेरिकेत न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, न्यूयॉर्कर, दि अटलांटिक आणि न्यूयॉर्क टाइम्स मॅगझिन यामध्ये समीक्षा वाचली होती. त्यात जेवढा रस वाटला होता तेवढाच रस घेऊन हे पुस्तक वाचले जाईल असे वाटले होते.

कदाचित “हिंदू” पूर्वी लक्षपूर्वक वाचल्यामुळेही असेल, परंतु मी "अळगडीचे अलंकारशास्त्र" वाचायला सुरुवात केली आणि आतापर्यंत बंद असलेल्या खजिन्याने भरलेल्या एखाद्या खोलीची किल्ली हातात मिळावी असे मला झाले. समीक्षाशास्त्राच्या इतिहासाचे संपूर्ण भान ठेवून, आणि त्यातील कळीच्या संकल्पनांचा वाचकाला सहजपणे परिचय करून देऊन, आणि त्या सर्व संकल्पना आणि इतिहास वापरून, परंतु महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील साहित्य यांचेही संपूर्ण भान ठेवून केलेली सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण अशी समीक्षा या पुस्तकात मला सापडली.

हे पुस्तक वाचताना अनेकदा मला एखाद्या सुंदर इमारतीच्या स्थापत्याची वाखाणणी करावी तशी या पुस्तकातल्या लिखाणाच्या बांधेसुदपणाची वाखाणणी करावी असे वाटले. अनेक ठिकाणी दोन तीन चार परिच्छेदात ज्या मुद्द्याची हळूहळू बांधणी होत असते त्याचा एखाद्या शेवटच्या वाक्यात परामर्ष झाला की गायक जसा समेवर आला की आपल्याला दाद द्यावीशी वाटते तशी, “वा!” अशी दाद द्यावीशी वाटली. थोरात यांच्या लिहिण्यात साहित्य समीक्षेतल्या संकल्पना अमूर्त राहत नाहीत. कुठल्याही संकल्पना वापरायच्या आधी त्यांची ते अगदी सहजपणे पण खोलात जाऊन ओळख करून देतात. या संकल्पना जरी मूळच्या युरोपियन किंवा अमेरिकन लेखकांनी मांडल्या असल्या तरी कादंबरीच्या संहितेतील चपखल उदाहरणे देऊन या संकल्पना ते मूर्त करतात.

कृषी संस्कृतीतील बायकांच्या शारीरिक कष्टाचे हिंदू मध्ये "भरतनाट्यमच्या हजारो मुद्रा", "आदिम नारी नृत्याचा ताल", "घरात खळ्यात बेभान होऊन नाचली जाणारी समूहनृत्य" अशी विशेषणे वापरून उदातीकरण केलेले आहे. यावर टीका करणारा थोरात यांचा जो परिच्छेद आहे तो मला फारच आवडला. जणू काही ते नेमाडे यांना, "तुमच्या इतकीच सुंदर भाषा वापरून तुम्ही जसे शोषणावर मुलामा चढवत आहात तसेच कठोर टीकेवर मुलामा चढवला तर कसे दिसते ते पहा", असे या परिच्छेदात म्हणत आहेत असे वाटले. याचप्रमाणे कादंबरीचा नायक/कथक एखाद्या फुलाच्या अनेक पाकळ्या अशी प्रतिमा वापरून जातीव्यवस्थेचेही उदातीकरण करतो, त्याचेही थोरात "पाकळ्या उधळणे" असे चपखल वर्णन करतात.

जागतिक मध्यमवर्ग आणि महाराष्ट्रीय मध्यमवर्ग यांच्यातील फरकाबद्दलचे थोरातांनी केलेले विवेचनही पटले आणि आवडले.

एकंदरीत समिक्षेबद्दल असलेले पुस्तक वाचून भारून जायला होईल असे मला कधी वाटले नव्हते. हे पुस्तक वाचून ते अनुभवायला मिळाले.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २४ ऑक्टोबर, २०२४.