Jiten Vaidya

← सर्व लिखाण

भास ११.२४ च्या अंकात मला अतिशय आवडणाऱ्या कीज जॉन्सनच्या गोष्टीचा अनुवाद आहे. तितकीच आवडणारी पण अगदी वेगळ्या प्रकारची "टाईडलाईन" नावाची एलिझाबेथ बेअर यांची कथा मी कुल्फी मासिकासाठी "सायंभरती" या नावाने भाषांतरित केली होती. ती कथा मी तुकड्या तुकड्याने इथे प्रकाशित करणार आहे....

भाग १

हिरकणी रडण्यासाठी घडवलेली नव्हती. तिला जर रडता आलं असतं, तर तिचे अश्रू थंड काचबिंदूंसारखे दिसले असते. ज्वालामुखीपेक्षाही उष्ण अशा शस्त्रांनी तिला पांगळं केलं होतं. त्यांच्या अग्निवर्षावात निर्माण होऊन हळूहळू थंड होत गेलेल्या काचबिंदूंसारखे.

ते अश्रू तिच्या सिरॅमिक शरीरावरून, वितळलेल्या सेन्सर्सच्या आजूबाजूनं खाली ओघळले असते आणि पायाखालच्या वाळूवर ठिबकले असते. तसं झालं असतं, तर तिनं ते काळजीपूर्वक उचलून घेतले असते. तिच्या फुटक्या कवचाला आधार देणाऱ्या जाळ्यावर सुंदर चकचकीत वस्तू लटकत होत्या. त्यांत तिनं तेही ठेवून दिले असते.

जर भंगार गोळा करायला कुणी माणसं उरली असती, तर त्यांनी हिरकणीला भंगारात जमा केलं असतं. पण ती शेवटची युद्धयांत्रिका होती. तीन पाय असलेली, अश्रूच्या थेंबाप्रमाणे खाली गोल आणि वरच्या भागात निमुळती होत गेलेली, एखाद्या मोठ्या रणगाड्याएवढी. तिला चिमट्यासारखे दोन मोठाले हात होते आणि डोक्यापाशी आणखी एक लहानसा हात होता. कोळ्याच्या पायासारखा मुडपून ठेवलेला तो हात हिरकणी नाजूक गोष्टी धरण्या-फिरवण्यासाठी वापरत असे. तिचं पॉलिसिरॅमिक कवच तडे गेल्यामुळे कोळ्याच्या जाळ्यासारखं दिसत होतं. दूरवरच्या मालकांनी वाऱ्यावर सोडून दिलेली हिरकणी समुद्रकिनाऱ्यावर खुरडत खुरडत, आपला एक वितळलेला पाय ओढत भटकत असायची.

त्या समुद्रकिनाऱ्यावरच तिला बबन्या भेटला.

#

#सायंभरती #tideline

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ७ नोव्हेंबर, २०२४.