#tideline #सायंभरती
भाग दोन:
परतणाऱ्या लाटांबरोबर घरंगळणारे शिंपले हिरकणीच्या वितळलेल्या पायाखालच्या चिखलात अडकत होते. हा एक पाय तिच्या मागच्या पायांच्या जोडीतला असल्यामुळे तिला त्याचा तसा काही त्रास नव्हता. घट्ट पुळणीवर टेकू म्हणून त्या पायाचा उपयोग व्हायचा. पण खडकाळ भागांपासून मात्र तिला दूर राहावं लागायचं .
भरतीच्या रेषेच्या बाजूबाजूनं खुरडताना हिरकणीच्या लक्षात आलं की आपण एकटे नाही, कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. तिनं वर पाहिलं नाही. पण तिच्याजवळ निशाणा धरू शकणारे सेन्सर्स होते. त्या सेन्सर्सचा डोळा आपोआप एका खडकाआड लपलेल्या, फाटक्या-तुटक्या कपड्यातल्या एका छोट्याशा आकृतीवर स्थिरावला. तिच्या डोळ्यांच्या जागीही दृष्टी-सेन्सर्स होते. ते मात्र भरतीबरोबर आलेल्या समुद्री शेवाळातून, लाकडाच्या ओंडक्यांतून, थर्मोकॉलच्या कचर्यातून आणि समुद्रकाचांतून वाट शोधण्याचं काम करत होते.
हिरकणी किनाऱ्याच्या टोकाशी पोचेपर्यंत तो तिच्यावर नजर ठेवून होता. पण त्याच्याकडे शस्त्र नव्हतं आणि तिच्या अल्गोरिदम्सनी ठरवलं की याच्यापासून आपल्याला धोका नाही.
बरंच झालं. कारण तो ज्या विचित्र आकाराच्या, पण वरून सपाट असलेल्या खडकामागे लपला होता, तो तिला आवडला होता आणि त्या दगडाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करणं तिला आवडलं नसतं.
#
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ८ नोव्हेंबर, २०२४.