Jiten Vaidya

← सर्व लिखाण

काल फिरायला बाहेर पडलो होतो तेव्हा मी ‘गुलाल’ पिक्चर मधलं ‘आरंभ है प्रचंड’ हे गाणं पुन्हा एकदा ऐकलं. दर वेळेला ते गाणं ऐकलं की मानेवरचे केस उभे राहतात. त्या गाण्याचे शब्दही मनातल्या कोमल भावना बाजूला सारून स्वतःशी आणि इतरांशी निष्ठुरपणे वागण्यासाठी आवाहन करतात, पण त्याबद्दल नंतर. संगीत, मुख्यतः गाण्याचा ताल आणि समूहगायन, यामुळे आपल्या कुठल्यातरी आदीम भागाला हाक मारली जाते, मानेवरचे केस उभे रहातात आणि गरज पडली तर थंडपणे आपणही हिंसा करू शकू अशी शक्यता मनाला चाटून जाते.

आणखी कुठली गाणी ऐकताना या प्रकारची भावना मनात येते असा विचार करताना १९८६ मध्ये आलेल्या पहिल्या “टॉप गन” पिक्चरच्या सुरुवातीला असलेल्या टायटल सिक्वेन्सची आणि पार्श्वसंगीत म्हणून वापरलेल्या “हायवे टू द डेंजर झोन” या गाण्याची आठवण झाली. भारतीय महासागरात कुठेतरी अमेरिकेच्या प्रचंड विमानवाहू जहाजाचा प्रवास चालू आहे. नुकताच सूर्योदय होत आहे, सकाळचं धुकं अजून पूर्णपणे गेलेलं नाही. बोटीवरचे खलाशी विमानं तपासत आहेत, त्यांना उड्डाणासाठी तयार करत आहेत आणि समुद्रावर गस्त घालण्यासाठी एफ-14 टॉमकॅट विमानं जहाजावरून आकाशात झेपावत आहेत असा तो सीन आहे. तो सिन आणि पार्श्वसंगीत म्हणून असलेलं केनी लॉगिन्सचं हे गाणं असंच अंगावर शहारे आणतं.

युद्धाचे पडघम - वॉर ड्रम्स - या गोष्टी कुठेतरी खोलवर आपल्या मेंदूच्या देठात वसत असल्या पाहिजेत. त्या ढोलांच्या नादांना प्रतिसाद देऊन, जीवावर उदार होऊन लढणाऱ्या पूर्वजांचे आपण वारस असणार आणि म्हणून अजूनही आपण या प्रकारच्या नादाला, तालाला असा आदिम प्रतिसाद देतो.

आणि अर्थातच हे राज्यकर्त्यांच्या, किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणात लोकांची मने आपल्या बाजूला वळवून घ्यायची आहेत त्यांच्या नजरेतून सुटलेले नाही. ‘आरंभ है प्रचंड’ मधल्या या दोन ओळी पहा:

मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले
वही तो एक सर्व शक्तिमान है

या गाण्याच्या नादात, तालात आणि शब्दात कोणत्याही समूहाला विवेक सोडायला लावून “मस्तकों के झुंड“ बनवण्याची ताकद आहे. तसेच “टॉप गन” हा कितीही मनोरंजक असला तरी तो अमेरिकेच्या पायलट्सच्या पुरुषत्वाचा (केली मॅकगिलीस इंस्ट्रक्टर असली तरी दुय्यम कॅरेक्टरच आहे) आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादाचा पुरस्कार करणारा चित्रपट आहे.

हाच ताल आणि नाद वापरून पण म्यूजिक वीडियो मध्ये निओ नाझी रॅली आणि “मस्तकों के झुंड“ सारखे मार्च करणारे हातोडे दाखवून आपल्या या आदिम प्रवृत्तीचे विडंबन करणारे गाणे म्हणजे “पिंक फ्लॉइड” या ब्रिटिश रॉक ग्रुपचे “द वॉल” या अल्बम मधले “फॉलो द वर्म्स” नावाचे गाणे. हे गाणे असाच मार्चिंगचा ताल वापरते आणि गाण्याच्या शब्दातून आपला हा जो आदिम प्रतिसाद आहे त्याचे विडंबन करते:

Would you like to see Britannia rule again?
My friend
All you need to do is to follow the worms

या ओळींचं भारताच्या संदर्भात केलेलं स्वैर भाषांतर:

दोस्ता, अखंड भारतावर भारतमातेचे राज्य हवं आहे?
झाक डोळे, आणि जा या आळ्यांच्या मागे!

या गाण्याच्या व्हिडीओ मध्ये दाखवलेले निओ नाझी स्वतःसाठी वर्म्स हा शब्द वापरतात परंतु आपल्या सारासार विवेकबुद्धीच्या कबज्याबाहेर असणाऱ्या मेंदूच्या देठाला (ज्याला इंग्रजीत “लिझर्ड ब्रेन” असा शब्दही वापरला जातो), ज्या भागातून या तालाला, या नादाला मानेवरचे केस उभे राहण्याची प्रतिक्रिया आपण देतो, त्या भागाचे वर्णन करण्यासाठी हे गाणे किड्यांची किंवा अळ्यांची प्रतिमा वापरत आहे असे वाटते. “रन लाइक हेल” आणि त्यानंतरचे “वेटिंग फॉर द वर्म्स” ही गाणी पाहून सुन्न व्हायला होते. “द वॉल” हा गाण्याचा अल्बम १९७९ मध्ये तर त्यावरचा चित्रपट १९८२ मध्ये प्रसारित झाला पण त्यात दिलेला धोक्याचा इशारा आजच्या जगात (भारतात आणि भारताबाहेरही) तितकाच, किंबहुना जास्तीच, लागू पडतो.

अशाच प्रकारचा आदिम, भावनिक प्रतिसाद आपल्याकडून दुसऱ्या कोणत्या गोष्टीला मिळतो असा विचार करताना - "वेडात मराठे वीर दौडले सात" अशा तऱ्हेच्या लास्ट स्टँड्स बद्दल वाचताना आणि बघताना मला नेहमीच पटकन भरून येते, असे लक्षात आले. आणि पुस्तकातली, चित्रपटातली, टीव्ही सिरीज मधली अनेक उदाहरणे आठवली. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

या तिन्ही गाण्यांच्या लिंक्स आणि शब्द कॉमेंटमध्ये.

लिंक्स:

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १२ डिसेंबर, २०२५.