मेघना तिच्या "वीज" नावाच्या कवितेत म्हणते:
"कुण्या विद्ध कवीनं लिहिलेली एखादी ओळ ऐकावी बेखबरपणी,
आणि ध्यानीमनी नसताना
आपल्याच वर्माचा पत्ता लागावा आपल्याला"
त्याचा अनुभव मला आज आला.
आपल्या सर्वात जुन्या, तीन-चार वर्षाच्या असतानापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंतच्या सर्व स्मृतींना अर्थ देणाऱ्या, सुसंगत आणि स्थिर अशा वाटणाऱ्या "स्व"त्वाची, स्वतःच्या असण्याची, जाणीव आपल्याला असते. तपशील महत्वाचे नाहीत पण काही वर्षांपूर्वी फार ताणाखाली असताना एक क्षण असा आला की ही सुसंगत जाणीव जर ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन फुटून गेली तर काय होईल याची फक्त चुणूक मला दिसली.
आज आरती प्रभू यांची "पारवे" ही कविता वाचत होतो. अंगावर काटा आला आणि सण्णकन वाटून गेलं की ही कविता अशाच वेडाच्या कडेला घेऊन जाणाऱ्या क्षणाबद्दल आहे.
आरती प्रभूंची कविता इथे आणि मेघनाच्या कवितेची लिंक कमेंट मध्ये.
पारवे - आरती प्रभू
हालली का गर्द जाळी, मंद झाले का दिवे?
शीळ आली कापरी अन् गारवा हा जाणवे.
पायवाटेची अडाणी नागमोडी वक्रता
देतसे देहास वेढे, पाय खिळतो चालता.
कोण होतो तेंहि नक्की नाठवे माझें मला,
वादळापूर्वीच झालो मी निनावी एकला.
लोळ आला अन् रान सारें पेटलें,
भूत जन्मापूर्विचें त्या येथ माझें भेटलें.
जन्म अन् मृत्यूमधे तें, तें घरी अन् अंतरीं,
कोण मी अन् कां इथे मी प्रश्नचिन्हांच्यापरी?
कां दुभंगू कां नये हा क्षितिजपडदा एकदां?
फक्त कानीं येत दिडदा येत दिडदा सर्वदा.
हालली कां गर्द जाळी, कांपरे झाले दिवे?
गोठलेल्या अन् गळ्याचे स्तब्ध येथे पारवे.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १२ एप्रिल, २०२६.