Jiten Vaidya

← सर्व लिखाण

दोन-तीन दिवसांपूर्वी 'All We Imagine as Light' या सिनेमाबद्दल "It is a genuinely forgettable film" अशी पोस्ट वाचली. त्यावर ही कॉमेंट लिहिली होती, ती इथे पोस्ट करत आहे (ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही आणि पहायची इच्छा आहे त्यांच्यासाठी: यात थोडी स्पॉयलर्स आहेत, पण हा काही प्लॉटसाठी पाहण्याचा सिनेमा नाही त्यामुळे माझ्यामते वाचायला हरकत नाही):

खरंच?

मी हा पिक्चर दोन-तीन आठवड्यापूर्वी पाहिला. ही पोस्ट पाहिल्यावर काय काय आठवत आहे आपल्याला ते बघूया, असा विचार केला आणि या गोष्टी मनात आल्या:

प्रभाचा नवऱ्याने पाठवलेला कुकर बाथरूममध्ये बसून कवटाळण्याचा सीन, अनु आणि तिचा बॉयफ्रेंड बस मध्ये उभे राहून जात असतात, ती चिडलेली असते आणि तो तिची समजूत काढतो आणि तिला सांगतो की पुढच्या आठवड्यात त्या दोघांना एका नातेवाईकाच्या घरी एकांत मिळण्याची शक्यता आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हसू आणि त्या बस मध्ये ती सगळं अंग वापरून त्याच्यावर रेलते तो सीन, तसेच अनु मांजराची अल्ट्रासाउंड करून झाल्यानंतर डॉक्टरांचा हात धरून त्यांना मांजराला हात लावायला शिकवते तो सीन, आणि प्रभा थोडी जेलसी, थोडी अनुबद्दलची काळजी, आणि थोडा सुप्त संस्कृतीरक्षकपणा यातून अनुला बोलते तो सीन, आणि त्यानंतर त्या रात्री तिची माफी मागते तो सीन. चित्रपटाच्या शेवटच्या भागातला अजिबात घाई गडबड नसलेला सेक्स सीन आणि त्यात शेवटी थोडं काहीतरी रहस्य समजल्यासारखं आणि थोडं हे काय एवढेच अशा दोन्हीचं मिश्रण असलेलं अनुच्या चेहऱ्यावरचं हास्य.

आणि या सिनेमाबद्दल लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे किती सहजपणे बाईच्या नजरेतून केलेला हा सिनेमा आहे. कपडे बदलताना अतिशय सहजतेने दाखवलेले अनुचे स्तन, प्रभा सहजपणे जंगलात खाली बसून लघवी करते तो सीन, आणि सेक्स सीन मध्ये पुरुषाची स्तनाग्रे आणि ओटीपोटावरचे केस दाखवले जाणे, स्त्रीचे नाहीत.

त्याच्यानंतर मुंबईच्या झगमगटाच आणि मुंबईतल्या आयुष्याचं छोट्या लोकांच्या नजरेतून केलेल चित्रण. आणि एकंदरीतच अनेक सीन्स मध्ये प्रभाचे डोळे आणि चेहरा. अशा कित्येक गोष्टी आठवल्या.

त्याच्यामुळे, विसरून जाण्यासारखा? मला तरी नाही बाबा वाटला.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १७ डिसेंबर, २०२४.