Jiten Vaidya

← सर्व लिखाण

"भास" तयार करतानाचा शेवटचे काही आठवडे फारच मनोरंजक असतात. गोष्टी वाचून आणि रेखाटकांच्या शैल्या बघून तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कुठला रेखाटक वापरावा याबद्दलचे ठोकताळे तयार केलेले असतात आणि कुठल्या गोष्टीला कुठली रेखाटने शोभून दिसतील याबद्दलही तुमच्या डोक्यात काही विचार असतात.

गोष्टीवर संपादकीय संस्कार करताना (किंवा माझ्या बाबतीत ते होत असताना पाहताना) या गोष्टी आणखीन पक्क्या होत जातात किंवा कमी पक्क्या होत जातात. पण हे सगळं खऱ्या जगात घडत असल्यामुळे रेखाटकांना बरं नसणं, त्यांच्याबरोबर काम करायला लागल्यावर असं लक्षात येण की ऍक्च्युली त्यांची शैली या कथेला सूट होत नाही आहे किंवा कधीकधी रेखाटकांना वेळ नसणं अशा सगळ्या गोष्टी होतात. पण गोष्टींना रेखाटनं तर हवीच, मग करायचं काय? अशा वेळेला तुम्ही तुमच्या भात्यातला रामबाण पुन्हा पुन्हा उपसता.

आम्ही श्रीबाला पहिल्यांदा रामचंद्र कदम यांच्या कविता आणि अमोल उदगीरकर याची सिरीयल किलर बद्दलची गोष्ट यासाठी रेखाटने मागितली होती. उदगीरकरच्या कथेसाठी फारसे काही सांगितले नसताना त्याने एसटीचा समोरचा भाग आणि सीरियल किलरने लहान असताना मारलेला पक्षी याची जी चित्रे काढली त्याने मला भारावून जायला झालं.

त्यानंतर मेघनाने आणि मी मिळून भाषांतरीत केलेल्या गोष्टीसाठी आम्हाला जी मूळ चित्रे मिळाली, ती आम्हाला आवडली नाहीत. मूळची कथा माझी आवडती कथा असल्यामुळे, आणि मी भाषांतरही केले असल्यामुळे चित्रे कशी असावीत याबद्दल माझ्या ठोस कल्पना होत्या. त्या सगळ्या समजावून घेऊन, पण स्वतःची कल्पनाशक्ती वापरून श्रीबाने सुंदर चित्रे काढून दिली.

आणि अगदी शेवटच्या दोन दिवसात रावभाजीची पावभाजी या सुंदर कथेला जो रेखाटक आम्ही योजला होता त्याच्या घरी आजारपण निघाले आणि श्रीबाच आमच्या मदतीला धावून आला. त्या गोष्टीच्या तोलामोलाची अशी सुरेख चित्रे त्याने अक्षरशः एक रात्र एक दिवसामध्ये आम्हाला काढून दिली.

श्रीबासारखा टॅलेंटेड, फास्ट, स्वतःचे इमॅजिनेशन असणारा, तुमच्या डोक्यात साधारण काय आहे हे काही वाक्यातच समजणारा, छान विनोद बुद्धी असलेला आणि ईमेलवर सतत उपलब्ध असलेला रेखाटक भासला मिळाला हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

थँक्यू श्री बा.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २८ ऑक्टोबर, २०२५.