विज्ञानकथांमध्ये अल्टरनेट हिस्टरी (पानिपतात मराठे जिंकले असते तर?) असा एक उपप्रकार आहे. आणि क्वांटम मेकॅनिक्सचे मेनी वर्ल्ड इंटरप्रेटेशन (श्रोडिंजरची मांजरी एका जगात जिवंत असते, तर दुसऱ्या जगात नसते - पण दोन्ही जगं एकाच वेळेला अस्तित्वात असतात) वापरून - थोडे फरक असलेली पण तरीही समांतर अशी जगे कल्पून - त्याचा विज्ञानकथेत वापर करणे हा त्याचाच आणखी एक उपप्रकार.
टोबियास एस. बकेल यांनी २०१८ साली लिहिलेली ही कथा याच उपप्रकारात मोडते. समांतर जगांचा ट्रोप वापरून ही कथा ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम अतिशय परिणामकारकरीत्या आपल्यासमोर मांडते.
कुणीतरी म्हटलं आहे की जर एखादी गोष्ट न समजण्यावर एखाद्याचा पगार अवलंबून असेल तर अशा माणसाला ती गोष्ट समजावून सांगणं फार अवघड असतं. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपल्या सगळ्यांच असंच झालेलं आहे. आपला विमानप्रवास, आपली चारचाकी, आपल्या घरातले एअर-कंडिशनर्स या साऱ्या गोष्टींना चटावलेले - किंवा याची अभिलाषा करणारे - आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल चुटपुटण्याशिवाय काही करत नाही. आपण सर्व जण घेत असलेले छोटे-मोठे निर्णय आणि “विकासा”ची आस पुढच्या सत्तर-ऐंशी वर्षांत जगाचं काय करणार आहे याची आपल्याला कल्पना नसते आणि आपल्याला याची कल्पना करून पहायचीही नसते.
ही गोष्ट मी पहिल्यांदा वाचली तेव्हा तिचा माझ्यावर फारच प्रभाव पडला होता. तेव्हापासून अनेकदा राज्यकर्ते पर्यावरणाबद्दलचे अप्पलपोटे निर्णय घेताना बघून या गोष्टीची आठवण येते. ही गोष्ट मराठी वाचकांना वाचायला मिळावी म्हणून या वर्षीच्या ‘भास’साठी मेघना आणि मी मिळून ती भाषांतरित केली. शिल्पकलेतील प्रतिमा वापरायची झाली तर मी संगमरवराचा ठोकळा तयार केला आणि मेघनाने त्यातून घडीव भाषांतराची मूर्ती तयार केली असे म्हणता येईल. “A world to die for” या शीर्षकाचे “जान निछावर करून टाकावी असं जग” हे सुरेख भाषांतरही तिचेच.
मूळ गोष्ट अमेरिकेतल्या मिडवेस्टमध्ये घडते. आम्ही ती महाराष्ट्रात, मध्य भारतात होताना दाखवली आहे. ही गोष्ट वाचताना काही वाचकांना ‘मॅड मॅक्स’ चित्रपटांची आठवण झाली हा काही योगायोग नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मध्य ऑस्ट्रेलियामधल्या वाळवंटासारखे वाळवंट अमेरिकन मिडवेस्टमध्ये किंवा मध्य भारतात होण्याची बरीच शक्यता आहे.
ही कथा अनुवादित करताना मराठी साहित्यातला आणखीन एक पडसाद मनात होता. तो म्हणजे महेश एलकुंचवार यांच्या वाडा नाट्यत्रयीतला शेवटचा भाग - युगांत. ही कथा त्या जगात थोडी पुढे घडू शकली असती असा विचार मनात येऊन गेला.
टोबियास एस. बकेल यांचे आम्हाला भाषांतर करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल आभार. मूळ गोष्टीची आणि भासची वेबसाईट खाली.
लिंक्स:
- मूळ गोष्ट (Tobias S. Buckell, Clarkesworld) https://clarkesworldmagazine.com/buckell_01_18/
- भासची वेबसाईट https://bhasprakashan.com/
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ८ नोव्हेंबर, २०२५.