मागच्या वर्षी सानियाची 'निरंतर वाटेवर' ही कादंबरी वाचल्यानंतर मैत्रिणीला लिहिलेल्या ई-मेल मधला हा भाग आज पोस्ट करत आहे. पोस्टमध्ये कादंबरीचा कथाभाग विस्ताराने आलेला आहे, तो समजल्यामुळे कादंबरी वाचण्याच्या आनंदात फारसा फरक पडू नये पण तरीही सांगून ठेवलेले बरे.
----
... मी एक आठवड्यापूर्वी "निरंतर वाटेवर" वाचायला सुरुवात केली. सुरुवातीचा, बाहेर दंगल चालू असताना तीन मैत्रिणी एका अपार्टमेंट मध्ये बऱ्याच वर्षानंतर भेटत असतात, या भेटीकडून आणि एक दुसऱ्याकडून काय अपेक्षा कराव्या याची त्यांना फारशी कल्पना नसते. हा भाग वाचून झाल्यावर पुस्तक बाजूला ठेवले गेले. काल मी परत पुस्तक वाचायला सुरुवात केली. यापुढच्या भागात तिन्ही मैत्रिणी स्वतःबद्दल स्वतःच निवेदक बनून आपल्याला त्यांच्या गोष्टी सांगतात. आणि मग मात्र पुस्तकाने माझी जी पकड घेतली, ती मी रात्री उशिरा पुस्तक संपेपर्यंत सोडली नाही.
या पुस्तकात एकमेकात गुंफलेल्या पाच गोष्टी आहेत असं मला वाटलं. चंदा, मालविका आणि रागिणी या तिघींच्या तीन गोष्टी, त्यांच्या मैत्रीची चौथी गोष्ट आणि हे पुस्तक ज्या काळात घडत आहे ज्यात या तिघी एकत्र आल्या आहेत ती पाचवी गोष्ट.
या सर्व गोष्टींपैकी मला चंदाशी गोष्ट सर्वात जास्त आवडली. मालविकाची गोष्ट सुद्धा बऱ्याच अंशी आवडली, परंतु रागिणीची गोष्ट मात्र फारशी भावली नाही. ते पात्रच नैसर्गिकपणे उतरले आहे असे वाटले नाही. तिची आई लवकर गेलेली आहे त्यामुळे तिच्या मुळाशीच एक असुरक्षितपणाचा भाव आहे. त्यामुळे म्हणा किंवा मूळच्या स्वभावामुळे म्हणा, तिच्यात धैर्य नाही. तिची रूममेट लीना तिला अबॉर्शन करण्यासाठी मदत मागते - रागिणी तिला मदत करते का नाही हे संदिग्ध ठेवलेले आहे, पण बहुधा करत नसावीच. असाच कचखाऊपणा ती जेव्हा तिच्या नवऱ्याची कलीग तिच्याकडे काही सांगायला म्हणून येते, तेव्हाही ती दाखवते. अशा या रागिणीची, जिच्यात इतर दोघींच्या मध्ये जी उत्कटता आहे, ती नाही आहे ती या दोघींची मैत्रीण का झाली किंवा त्यांची मैत्री का टिकली असे विचार मनामध्ये येऊन गेले. मी स्वतःला असेही विचारून पाहिले की ही रागिणी माझ्यापेक्षा वेगळी असल्यामुळे किंवा मला जे गुण आवडतात ते गुण तिच्यात नसल्यामुळे मला तिच्याबद्दल असे वाटते आहे का? पण तसे नसावे. एखादी कादंबरी वाचताना त्यातल्या पात्रांच्या खरेपणामुळे जरी ती कमकुवत असली तरी जर त्यांचा कमकुवतपणा सच्चेपणाने, त्रीमित रूपात आपल्यासमोर आला तर ती आपल्यापेक्षा वेगळी असली, त्यांच्यातल्या दोषांसकट आपल्यासमोर ठेवली असली, तरीही त्यांच्याबद्दल आपल्याला आत्मीयतेची भावना येते, पण रागिणीबद्दल हे झाले नाही.
चंदाचे आणि तिच्या आईचे नाते फारच सुंदररित्या रेखाटलेले आहे. एकंदरच आईचे पात्र सुरुवातीपासून थोडेफार बदलत जाऊन पण तरीही फारसे न बदलता पण तरीही चंदाला एक आई म्हणून जो विश्वास मुलांना लागतो ते देऊ शकणार असं अतिशय पारंपारिक पण तरीही स्वतःच हित कशात आहे याची बऱ्यापैकी जाणीव असणार आणि बदलाला सामोरे जाण्याचे धैर्य नसणार असं त्रिमित आणि पूर्ण असे आहे. आणि त्यामुळे चंदाचे आणि तिचे नाते याचे रेखाटनही त्रिमित झालेले आहे. तसेच चंदा आणि तिच्या भावाचे सुरुवातीचे नाते, मग तरुणपणी झालेला थोडा फरक आणि मग चंदाला स्वतःला त्या नात्यातल्या शक्यतांची जाणीव होऊन तिने पुढे केलेला हात तिच्या भावाने स्वीकारणे आणि नंतर तिच्या भावानेही बाहेर पडून विचार करून स्वतःच्या मर्जीने लग्न करणे आणि जैविक मुलाऐवजी एक मुलगी दत्तक घेणे असे दोन अनकन्व्हेन्शनल निर्णय घेणे वगैरे हे सर्व अतिशय नैसर्गिक वाटते. आणि त्या कुटुंबातील नानांना जरी फारसा वेळ कादंबरीत दिलेला नसला तरी त्यांचे असणे आणि न बोलता चंदाला आणि चंदाच्या निर्णयांना दिलेला आधार हाही नैसर्गिक वाटतो. एकंदरीतच या कुटुंबाचे रेखाटन आणि चंदाच्या आयुष्याचे, तिच्या पुढे आलेल्या प्रश्नांचे, हळूहळू होत गेलेल्या तिच्यातल्या बदलांचे - आधी कॉलेजात लेखनाची सुरुवात, जहांगीर बरोबर घट्ट होत गेलेली मैत्री आणि पुढे प्रेम आणि नंतर शिरीनकडे केलेले लेखन यामुळे तिच्यात जे हळूहळू बदल होत जातात तेही फार उत्तम साकारलेले आहेत असे वाटते.
मालविकाचे लहानपण, मालविका आणि प्रद्युम्न या दोघांमधील नाते, त्या नात्यातला एकबाजूपणा, मालविका आणि सोना यांची मैत्री आणि तिचा मृत्यू या सर्व गोष्टीही अतिशय सुंदर प्रकारे रेखाटलेल्या आहेत. मालविकाची आणि सीतामाईचे नाते सुद्धा अतिशय खरे वाटते. परंतु मालविकाचे जेके यांच्या सेडक्शनला बळी पडणे, तिला आधी वाटणारी स्वतःची कॉम्प्लसिटी, आणि बऱ्यापैकी स्वार्थीपणाने घेतलेला "अमेरिकेत जाण्याची संधी, याच्या बदल्यात जेके यांना आपले शरीर" हा व्यवहार, हे सर्व मला जरा thin वाटले. म्हणजे मालविका एकटी आहे, ती तरुण आहे, आणि शरीराच्या उर्मी आहेतच पण अगदी पहिल्यापासून तिच्या मनात जेके यांच्या बद्दल काहीही ममत्व नाही. त्यांनी सीतामाईला जवळ केले, तिच्याशी लग्न केले, हा व्यवहार आहे असे मालविकाच्या मनात आहे. हे ममत्व मनात नसल्यामुळेसुद्धा कदाचित व्यवहार म्हणून त्यांच्याबरोबर शरीर संबंधांना मूकपणे का होईना पण हो म्हणणे, हे मालविका करू शकली असेल. परंतु हे ममत्व नसताना सीतामाईची जी प्रतारणा ती करते, ते करण्यासाठी लागणारा इमोशनल ड्राईव्ह तिच्यात कसा निर्माण होऊ शकला असा थोडा मला प्रश्न पडला.
मालविका ही एक जखमी, डॅमेजड अशी व्यक्ती आहे. अमेरिकेत असताना एका घटकेला डिप्रेशन मध्ये च्या गर्तेमध्ये ती कोसळते. त्यातून बाहेर येण्यासाठी ती जे करते ते थोडक्यातच पण सुंदर लिहिलेले आहे. पण तिथेही एक त्रुट मला जाणवली ती म्हणजे थेरपीस्टशी बरोबरची सेशन्स, त्यामधून केलेले आत्मनिरिक्षण, त्याला लागणारे धैर्य हे सारे फक्त एका शब्दात संपवले आहे, "बोलले". तिच्यासारख्या व्यक्तीला, जिने अनेक गोष्टी आत दाबून ठेवलेल्या आहेत, तिला हा थेरपीचा अनुभव मोठा असणार आणि त्याबद्दल तिने सहजपणे एका वाक्यात सांगावे हे जरा असंभव वाटले.
आपलं खरं जीवन कसं असतं, त्याचा पोत काय असतो याबद्दल दोन-तीन ठिकाणी या कादंबरीत चिंतने आहेत ती मला आवडली. आयुष्यात एकापुढे एक येणारे प्रसंग, घडणाऱ्या घटना आणि ते आपल्याला न पाहण्याचा किंवा न जगण्याचा काहीच पर्याय नसणं यामुळे आयुष्यात असणारी एक प्रकारची अपरिहार्यता याचे सुंदर भान या कादंबरीत आहे.
माणसामाणसातल्या नात्यांबद्दल, लग्नसंस्थेबद्दल, शरीरसंबंधांबद्दल, आपल्या समाजाचे सध्या जे काही चाललं आहे त्याबद्दल या पुस्तकात जे भाष्य केलेले आहे ते फार पटले. तसेच टीव्ही, समाज माध्यमे, सगळीकडे सतत मते देत असणारे लोक आणि त्यामुळे तयार होणारा एक अवकाश याची या पुस्तकातील वर्णने/ विश्लेषणही मला फार आवडले....
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २ फेब्रुवारी, २०२६.