Jiten Vaidya

← सर्व लिखाण

आरती प्रभूंच्या कविता पहिल्यांदा नीट वाचतोय, आणि वाचता वाचता थक्क होतोय.

"अर्थ" अशा शीर्षकाची "नक्षत्रांचे देणे" मधली ही कविता:

मांजरीच्या पिलांचे डोळे नुकतेच उघडलेले,
कुठूनतरी आलेलें पत्र नातलगांच्या खुशालीचें,
मुलें म्हणताहेत, "ओटीवर झोपाळा बांधायचा का?"
नुक्तीच एक केळ पसवून पोक्त झालेली...

अर्थहीन पण सूत्रबद्ध असे अनेकजण
अनेकदा खाजवतात उघड्यावर मांड्या,
तरी मांजर कशी स्पर्शाळूपणे पाहूं शकते?
केळसुद्धा पसवते? खुशालीचें पत्र कसें येतें?

उजाडणारा प्रत्येक दिवस आकाशाचा गर्भपात,
जीवनें असतात अनेकदा आत्महत्यांच्या अफवा,
तरी पाहा ना कशी फूल फुलण्याच्या प्रक्रियेसारखी
हळुवारपणे जिरवतेय ही माझ्या तान्ह्याच्या टाळूवर तेल !

या सगळ्याचा अर्थ गजकर्णाच्या मांडीइतका :
कदाचित् तो अर्थ म्हणजेहि खाज असेल, नसेलहि, व
पण या चामडीच्या गाभ्यांत आज अनंत वर्षे
नांगरून पडलेंय गाणें... तरी सुरू कसें पैपैसा देणेघेणें?

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २० फेब्रुवारी, २०२६.